ठाकरे गटाला मोठा धक्का : किशोर जैन समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल

Sunil tatkare & kishor jain
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
मुंबई येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आज महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच नागोठणे परिसरातील ठाकरे गटाचे खंबीर आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे किशोर जैन यांनी राष्ट्रवादी विचारांचा स्वीकार करत आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी किशोर जैन यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला.
प्रवेशावेळी बोलताना किशोर जैन म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विकासाभिमुख विचार, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबतची ठाम भूमिका आणि तटकरे कुटुंबाचे नागोठणे व कोकणातील भरीव नेतृत्व पाहून आपण हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात नागोठणे परिसरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी किशोर जैन व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत सांगितले की, त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार असून नागोठणे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम होईल. मंत्री अदिती तटकरे यांनीही महिला, युवक आणि सर्वसामान्य घटकांच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच किशोर जैन यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे नागोठणे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *