रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषदच्या वणी येथील सांस्कृतिक वारसा असलेल्या प्राथमिक शाळेतील अंगणवाडी तसेच पहिली ते सातवीच्या लहान लहान विद्यार्थ्यांनी मंगळवार 16 जुलै रोजी भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन केले आहे.
साक्षात विठ्ठल रुक्माई तसेच सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा परिधान करून विठ्ठल रुक्माई मंदिरातून निघालेली दिंडी भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात,भजन,कीर्तन करीत तसेच वारीचा अनुभव घेत गावात फिरून शाळेत आणण्यात आली.
शाळेत आल्यानंतर ह.भ.प. विठोबा मांडलुस्कर महाराज यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी निमित्त वारी का निघते? वारीचे महत्व काय आहे? याची सविस्तर माहिती व मार्गदर्शन आपल्या प्रवचनातून विद्यार्थ्यांना केले.
सदरील उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल नागोठकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षिका सुचिता पाटील व रूपाली कोळी तसेच अंगणवाडी शिक्षिका मनाली आवाद, मदतनीस उज्वला वनकर यांनी मेहनत घेतली असून या दिंडीच्या वेळी विद्यार्थी,त्यांचे पालक व गावातील नागरिक सहभागी झाले होते.