महाराष्ट्र शासनाचा राजपत्र (असाधारण भाग एक अ, कोकण विभागीय पुरवणी क्रमांक – RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४ जुलै २०२५) नुसार, उरण पंचायत समितीच्या बैठकीत नवघर जिल्हा परिषद प्रभागाची नवीन रचना करण्यात आली आहे.
२०१७ च्या निवडणुकीपूर्वी नवघर जिल्हा परिषद प्रभागात समाविष्ट असलेली सोनारी, करळ व सावरखार ही गावे सध्याच्या रचनेत वगळण्यात आली होती. ह्या गावांचा पुन्हा नवघर प्रभागात समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तसेच काळा धोंडा हा भाग चाणजे ग्रामपंचायतीचा घटक असल्यामुळे त्याचा समावेश चाणजे जिल्हा परिषद प्रभागात करण्यात यावा अशीही मागणी आहे.
१२ वर्षांपासून जनगणना न झाल्यामुळे प्रभागांतील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे पारंपरिक गावांना वगळता नव्या प्रभाग रचनेत २०१७ पूर्वीची स्थिती कायम ठेवावी, अशी हरकत आणि विनंती तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.