
उरण (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील चिरनेर येथे १९३० च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृतीदिनाचा ९५ वा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरण पोलिसांच्या वतीने हुतात्मा स्मृती स्तंभासमोर बिगुल वाजवून व बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
हुतात्म्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला व चिरनेर ग्रामपंचायतीच्या विविध समस्यांबाबत चर्चा झाली. गावातील रस्त्यांसाठी आवश्यक निधीबाबत खासदार बारणे यांनी १० लाख रुपये तातडीने मिळवून देण्याचे जाहीर केले. शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत व अन्य मान्यवरांनी चिरनेरला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची तसेच एमएमआरडीए व वसई विरार कॉरीडॉर प्रलंबित प्रश्नांवर तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गेल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. शेवटी प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
Related