चारशे वर्ष जुना ऐतिहासिक आंबा नदीवरील पूल पुन्हा वाहतुकीस बंद – नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल

Nagothane bridge
नागोठणे (महेंद्र माने) : 
नागोठणे-वरवठणे-रोहाकडील गावांना जोडणारा सुमारे चारशे ते साडेचारशे वर्षांपूर्वीचा आंबा नदीवरील ऐतिहासिक पूल पुन्हा एकदा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पुण्यातील इंद्रायणी नदीवरील अलीकडील दुर्घटनेनंतर सोमवार दि. 16 जून रोजी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर “वाहतूक पूर्णतः बंद” असा बोर्ड लावून दोन्ही बाजूंनी बॅरीकेट्स लावून बंदीची अंमलबजावणी केली आहे.
या निर्णयामुळे नागोठणे परिसरातील नागरिक, आदिवासी वाड्यांमधील विद्यार्थी व रोजंदारी करणाऱ्या नागरीकांना दोन ते तीन किलोमीटरचा वळसा घालावा लागत असून, त्यांचे हाल सुरू झाले आहेत.
या ऐतिहासिक पूलाचे बांधकाम मोगल काळात गूळ, चुना आणि अंडी यांचा वापर करून करण्यात आले होते. वर्षानुवर्षे महापुरांचा मारा सहन केलेल्या या पुलावर युती सरकारच्या कार्यकाळात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. परंतु, कालांतराने कठडे तुटल्याने खाजगी अवजड वाहनेही पुन्हा सुरू झाली होती.
२ ऑगस्ट २०१६ रोजी महाड येथील पूल दुर्घटनेनंतर शासनाने सर्व प्रकारच्या वाहनांना बंदीचा बोर्ड लावला होता, मात्र प्रत्यक्षात हलकी वाहतूक सुरळीत सुरू होती. आता इंद्रायणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही वाहतूक पूर्णतः थांबवली आहे.
—————————————-
सदरील पूल हा 400 ते 450 वर्षापासुनचा पुल आहे. यावरील 1995 साली युती सरकारने अवजड वाहतूक बंद केली आहेत. तेव्हा पासून अवजड वाहतूक बंद असली तरी यावरच न थांबता या ठिकाणी नवीन पूल होणे गरजेचे आहे. याबाबत मी खासदार,आमदार यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे परंतु याचे साधे उत्तरही आले नाही. हा पुल चुना व दगडाने बांधलेला होता परंतु आता त्याची दगडे निघून जात असून पूल पोकळ झाल्याचे निदर्शनात येत आहे. आजपर्यंत तेथे वाढलेली झाडे झुडपे यांची साफसफाई संबंधित खात्याने केलेली नसून ती साफ सफाई मी नेहमी करीत असलो तरीही आज ना उद्या हा पूल पडणार असून या ठिकाणी शासनाने लक्ष दिले पाहिजे जेणे करून जीवितहानी होणार नाही.तसेच सदर पुलाच्या शेजारी नविन पुल बांधकाम करण्यासाठी मी अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे.   
..किशोर म्हात्रे, वरवठणे ग्रामस्थ तथा भाजपा माजी उपजिल्हाध्यक्ष  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *