मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार वाय-फायमुळे ग्राहकांना अनलिमिटेड डेटा सर्व्हिस मिळते. त्यामुळे काम कायम सुरू राहतं. फोनवर इंटरनेट वापरताना डेटा बंद केला जातो; मात्र घरातला राउटर कायमच सुरू ठेवला जातो. घरातली सर्व डिव्हायसेस राउटरशी जोडलेली असतात; मात्र वाय-फाय सुविधेचे काही दुष्परिणामही आहेत.
फार कमी जणांनाच हे माहिती असेल, की वाय-फायमुळे आपल्या आरोग्याचंही नुकसान होऊ शकतं. जेव्हा इंटरनेटचं काम नसेल, तेव्हा राउटर बंद ठेवला पाहिजे. रात्री झोपल्यानंतर इंटरनेटचा वापर बंद होतो. त्यामुळे त्या काळात आपल्या प्रकृतीला होणारं नुकसान टाळण्यासाठी राउटर बंद केला पाहिजे. वाय-फायला WLAN असंही म्हटलं जातं.
ते एक प्रकारचं वायरलेस नेटवर्क असतं. त्यात कमीत कमी एक अँटेना इंटरनेट आणि वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेसशी (म्हणजेच लॅपटॉप, कम्प्युटर, फोन, इत्यादी) जोडलेला असतो. वाय-फाय नेटवर्क इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीचा वापर करतं. वाय-फायच्या सान्निध्यात बराच काळ राहिल्यास आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे झोपही खराब होऊ शकते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री आपल्या घरातलं वाय-फाय बंद केलं पाहिजे. एक म्हणजे चांगल्या झोपेसाठी हे आवश्यक आहे. तसंच, आपलं कनेक्शन सुरक्षित राखण्यासाठी, हॅकिंगपासून त्याचा बचाव करण्यासाठी, हॅकिंगची जोखीम कमी करण्यासाठीही वाय-फाय रात्री बंद करणं गरजेचं आहे. कारण हॅकिंगसारखी गैरकृत्यं करणारी मंडळी रात्रीच्या कालावधीत असे काही प्रयत्न करू शकतात. शिवाय, वाय-फायमधून निघणारं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतं.