
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील मौजे नवीन शेवा येथे गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास एका घराचा स्लॅब अचानक कोसळून झोपेत असलेले आई, वडील आणि ८ ते १० वर्षांचा मुलगा ढिगाऱ्याखाली अडकले. ग्रामस्थांच्या तत्परतेने आणि अग्निशमन दलाच्या मदतीने तिघांची सुटका करण्यात आली असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे नवीन शेवा येथील चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
दि. १६ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ६ वाजता नवीन शेवा येथील एका जीर्ण घराचा स्लॅब अचानक कोसळला. त्यावेळी घरात झोपलेले आई, वडील आणि त्यांचा ८ ते १० वर्षांचा मुलगा ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच शेजारील ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करून सर्वप्रथम लहान मुलाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आई-वडिलांची ढिगाऱ्याखालून सुटका केली. जखमी तिघांनाही तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेएनपीटी प्रकल्पासाठी विकासाच्या नावाखाली नवीन शेवा येथील भूमिपुत्रांनी आपली जमीन शासनाला दिली. मात्र, ४० वर्षांनंतरही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. तात्पुरत्या जागांवर पक्की घरे उभारण्यास परवानगी नसल्याने अनेक कुटुंबे मोडकळीस आलेल्या, धोकादायक घरांमध्ये राहण्यास भाग पडली आहेत. पुनर्वसनाच्या जमिनी संबंधितांच्या नावावर न झाल्याने सातबारा मिळालेला नाही आणि त्यामुळे घरांच्या दुरुस्तीसाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी बँकांकडून कर्जही मिळत नसल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली.
या दुर्घटनेनंतर जखमी कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचार आणि संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नवीन शेवा येथील रखडलेले पुनर्वसन, सातबारा हक्क आणि सुरक्षित निवासाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Related