उन्हाळा सुरू झाला की, शाळा-कॉलेजची वर्षभराची शैक्षणिक धावपळ संपते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वाटू लागते मामाच्या गावाला किंवा मूळ गावी जाण्याची! हीच संधी साधत रायगड एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा उन्हाळी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ एप्रिल ते १५ जून २०२५ या कालावधीत १६ अतिरिक्त बसेस रोज धावणार असून, लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गांवर प्रवाशांची गर्दी पाहून फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः पनवेल मार्गावरही गरजेनुसार जादा वाहतूक केली जाणार आहे.
गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणेच, सरकारी नोकरदार, शिक्षक, चाकरमणी आणि पर्यटकांसाठी ही चांगली सुविधा ठरणार आहे. रायगड आणि कोकण भागात उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी वर्दळ असते. ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हापूस आंबा व रानमेव्याची चव चाखण्यासाठी पर्यटक कोकणाची वाट धरतात.
तर मग, उन्हाळी सुट्टीसाठी बॅग भरायला घ्या आणि रायगड एसटीची तिकिटे लवकर बुक करा, कारण गाडी सुटली की सुटलीच!