पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत उभी असलेल्या आलिशान कारची काच फोडून दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील काही ऐवज तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कल्ले गाव येथील गो ग्रीन हॉटेलच्या पार्किंगमध्ये फिर्यादी यांनी त्यांची फॉर्च्युनर कार उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजूची मागील काच फोडून गाडीत ठेवलेली पर्स चोरी केली. या पर्समध्ये एकूण ८ लाख ४८ हजार ५०० रुपयांचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम होती. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनील कुदळे, पोहवा सतीश तांडेल आणि पोहवा शिवाजी बाबर यांच्या पथकाने कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील इंडी येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरोपीत नामे शेरा सुरेश चव्हाण, (वय ४१ वर्षे, रा. शिरढोण, म्हाडा, बी-४, रुम क्र. १०३, पहिला माळा, खोणी पलावा, मानपाडा, डोंबिवली.. जि. ठाणे मु.रा. नवपुरा गाव, पो. बोगना, मर्दा थाना, जि. काझीपुर, उत्तरप्रदेश) व विनोद उर्फ लंगडा अशोक पवार ( वय ४३ वर्षे, रा. अंबुजवाडी, लक्ष्मी चाळ, मालवणी, मालाड, मुंबई मुळ रा. आंजुर्गी, ता. जि. विजापूर, राज्य कर्नाटक). न्यायालयाने दोन्ही आरोपींना १६ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या तपासात आरोपींकडून चोरीतील सोने, लेडीज पर्स असा १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली ७० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी शेरा सुरेश चव्हाण याच्यावर मुरबाड, निगडी, वर्सोवा, कोपरखैरणे, खारघर, नवघर, सीबीडी बेलापूर, पनवेल शहर, रबाळे, तळोजा, खांदेश्वर, नेरुळ, दादर, बोईसर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर विनोद उर्फ लंगडा अशोक पवार याच्यावर निगडी, गावदेवी, मालवणी, चारकोप आणि बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.
पोलीस आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.