कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी

कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी
मुंबई (शांताराम गुडेकर) : 
कोकणच्या सामाजिक, आर्थिक व औद्योगिक विकासासाठी स्वतंत्र कोकण राज्य अभियान ही व्यापक चळवळ सुरू करण्यात आली आहे. या अभियानातून स्थानिक लोकांचा सहभाग वाढवून त्यांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. “आपले कोकण वाचविण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्य असणे गरजेचे आहे” असे प्रतिपादन स्वतंत्र कोकण राज्य अभियान समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले.
कर्जत येथे आयोजित संपर्क अभियानात अरविंद भागवत यांनी उपस्थित मान्यवर संजय कोकरे यांची ओळख करून देत स्वागत केले. या कार्यक्रमाला अरविंद भागवत, उल्हास दाबके, सतिश मुसळे, विशाल बांदोडकर, मुरलीधर कलगुटकर, जयेश जाधव उपस्थित होते. कोकण राज्य अभियानाच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करून उध्वस्त होत असलेल्या कोकण प्रांताला वाचविणे व कोकण जनतेतील न्यूनगंड दूर करणे हा उद्देश आहे.
 मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेला कोकण राज्याचा नकाशा तयार करून स्वतंत्र कोकण राज्याची मागणी केंद्र सरकार व राष्ट्रपतींना सादर केली जाणार असल्याचे संजय कोकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *