कुडपण बुद्रुकमध्ये सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहापूर्वी रस्ता-साकव दुरुस्तीची ग्रामस्थांकडून तातडीची मागणी

Kudapan
पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील सर्वात उंच असलेले ब्रिटीशकालीन थंड हवेचे ठिकाण कुडपण बुद्रुक येथे यंदा सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होणार असून यानिमित्त राज्यभरातून असंख्य वारकरी मंडळींची गर्दी उसळणार आहे. मात्र, तत्पूर्वी कुडपण बुद्रुक रस्ता आणि थोरली नदीवरील पुलाच्या दुरूस्तीची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
ब्रिटीशांनी महाबळेश्वर हे हिलस्टेशन विकसित केले त्याच काळात पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक गावाचीही हिलस्टेशन अशी नोंद ब्रिटीशदप्तरी तसेच नकाशामध्ये करून विकसित करण्याचा विचार केला होता. या गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने माजी मंत्री स्व. प्रभाकर मोरे यांच्याप्रमाणेच माजी आमदार स्व.माणिकराव जगताप यांनी यशस्वी प्रयत्न केले. सद्यस्थितीत क्षेत्रपाळ या पायथ्याच्या गावापासून थेट कुडपण खुर्द शेलारांच्या कुडपणपर्यंत रस्ता करण्यात आला. मात्र, आता या रस्त्याची पूर्णपणे दूरवस्था झाली आहे.
कुडपण गावाचे सुपुत्र नायक कृष्णा सोनावणे यांनी ब्रिटीशांच्या बॉईज कंपनीतून सैन्यात प्रवेश घेतल्यानंतर स्वतंत्र भारतातील सेनादलामधून पाकिस्तानी सैन्याची आणि कबाली घुसखोरांची दाणादाण उडविल्याबद्दल त्यांचा महावीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याकाळी जन्मगावी कुडपण येथे सेवानिवृत्तीनंतर राहून उर्वरित आयुष्य कंठणे, तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे केवळ अशक्य असल्याने त्यांनी येथे राहणे टाळले. कुडपण येथील भिमाची काठी या दूर्गम सुळक्यावर चढाईसाठी प्रस्तरारोहक तसेच बर्मा ब्रिज बांधून काही गिर्यारोहकही तीन-तीन दिवसांचे कॅम्प करत असत.अलिकडेच, पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी शेलारमामांची समाधीदेखील असणे, हा निव्वळ कल्पनाविलास असल्याची चर्चा होऊ लागल्याने शेलारांच्या कुडपणची आध्यात्मिक एकजूट पाहता शेलारमामा कुडपणमधील असल्याची आणि त्यांची समाधी आढळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
चार वर्षांपूर्वी खेड येथील लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक सातारा जिल्ह्यातील कोंडूशी गावातून परत येताना दरीत कोसळल्यानंतर कुडपणपासून कोंडूशीपर्यंत कायमस्वरूपी पक्का रस्ता करण्याची मानसिकता वाढीस लागली. माजी पालकमंत्री अदिती तटकरे या पर्यटन राज्यमंत्रीही असल्यामुळे त्यांनी कुडपण दौरा पूर्ण केला आणि तब्बल 10 कोटींचा निधी जाहिर केला. पण तत्कालीन आ.गोगावले यांनी तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांना विरोधाचा उघड पवित्रा घेतल्यानंतर निधी बारगळला आणि कालांतराने कुडपणच्या पर्यटनविकासाची चर्चा क्षीण झाली. सद्यस्थितीत ना.अदिती तटकरे आणि ना.गोगावले दोघेही महायुती राज्यसरकारमध्ये मंत्री आहेत. ना.अदिती तटकरे यांच्या आजी आणि ना.गोगावले हे स्वत: श्रीगणेशनाथ महाराज संस्थानचे अनुयायी आहेत. याच संस्थानातर्फे यंदा कुडपण बुद्रुक येथे सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याने कुडपण ते क्षेत्रपाळ रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासोबतच थोरली नदीवरील साकव व बांध नव्याने बांधण्याची अथवा दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कुडपण बुद्रुक येथील दि. 29 डिसेंबर 2025 ते दि.1 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त येथे चार मोठे प्रशस्त मंडप उभारण्यात येणार असून वारकरी भाविकांसाठी तंबू उभारून राहण्याची सोयही करण्यात येणार आहे. मात्र, कुडपण ते क्षेत्रपाल रस्त्याची अतिशय बिकट आणि धोकादायक अवस्था तसेच थोरली नदीवरील साकव व बांधाची जिर्णावस्था पाहता वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह कायम राहणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थानिक प्रशासन, तहसिलदार तसेच रायगड जिल्ह्यातील दोन्ही मंत्रीमहोदयांनी तातडीने लक्ष घालून राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय टाळण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *