रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असताना, खर्डी–नेवाळी–हिरकणीवाडी–किल्ले रायगड असा नवीन रस्ता तयार करण्यात आला. तथापि, हा रस्ता स्थानिक नागरिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आणि भूमितीचा अभ्यास न करता बनवण्यात आल्याचे आता स्पष्ट होत आहे.
नेवाळी गावाच्या डोंगराळ भागातून जाणारा हा रस्ता अरुंद वळणं आणि तीव्र उतारांनी युक्त असल्यामुळे वाहनांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. मोठ्या वाहनांचा प्रवास शक्य नसल्यामुळे, पर्यटनासाठी करण्यात आलेला हा रस्ता प्रत्यक्षात वाहतुकीसाठीच बंद करावा लागल्याची दुर्दैवी स्थिती आहे.
स्थानिक रहिवासी यशवंत आखाडे यांच्या मते, “नेवाळीच्या घाटात तीव्र वळण ठेवण्याऐवजी आम्ही पर्यायी मार्ग सुचवला होता. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या हितासाठी नागरिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले.”
केवळ एका वर्षात चार ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. खराब निकषांचे गटार व मोऱ्या, निकृष्ट दर्जाचे रुंदीकरण, यामुळे या मार्गाचे काम नासधूस झाले. आज त्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू असले तरी, हा मार्ग भविष्यातही घातक आणि अपूर्ण भासणारा राहील, हे स्थानिकांचा स्पष्ट इशारा आहे.
प्रश्न असा आहे की, महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी रस्त्याच्या डिझाइनच्या वेळी या त्रुटी का ओळखल्या नाहीत? यामध्ये ठेकेदाराला मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून, शासनाचे कोट्यवधी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेले. त्याचवेळी ना लोकप्रतिनिधी बोलत आहेत, ना अधिकारी.
पर्यटनाच्या नावाखाली करण्यात आलेल्या या मनमानी कारभाराचे परिणाम आज रायगड पर्यटनाच्या पायात अडथळा ठरत आहेत. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी स्थानिकांची जोरदार मागणी आहे.