नेरळ येथील एका व्यावसायिकाला तब्बल ४८ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. कस्टममधून स्वस्तात लक्सरी कार, क्रेन स्वस्तात घेऊन देतो सांगत लुबाडण्यात आले आहे. गंडा घालणारे वेगवेगळे मार्ग अवलंबत असून अजूनही नागरिक त्यांना सहज बळी पडत असल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे. दरम्यान याबाबत फिर्यादी यांनी नेरळ पोलुईस ठाण्यात तक्रार देताच नेरळ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेरळ येथील फिर्यादी सागर सुनील हजारे यांचा क्रेनचा व्यवसाय आहे. तर त्यांची नुकतीच अमोल विठोबा तोडकरी रा घणसोली, नवी मुंबई यांच्याशी ओळख झाली होती. अमोल तोडकरी याने आपण जेएनपीटी उरण येथे कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच कस्टमच्या गोडाऊनमधून स्वस्तात वस्तू आणून देतो असे देखील सांगितले होते. त्यानुसार त्याने वॉशिंग मशिन व आयफोन १४ देऊन फिर्यादी सागर यांचा विश्वास संपादन केला.
वस्तू स्वस्तात मिळाल्याने हजारे देखील खुश होते. तेव्हा आता लक्सरी कार, क्रेन, ओला स्कुटी तसेच इतर घरगुती साहीत्य देतो असे त्याने सांगितले आणि सांगुन फिर्यादी यांचे कडुन वेळोवेळी तब्ब्ल ४८ लाख ३४ हजार ५०० रुपये ऑनलाइन स्वत.चे खात्यावर घेतले. मात्र वस्तू आज देतो उद्या देतो म्हणत त्याने वेळ काढायला सुरुवात केली. एवढी मोठी रक्कम दिल्याने हजारे हे देखील हवालदिल झाले अखेरीस त्यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठत आरोपी अमोल विठोबा तोडकरी यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
नेरळ पोलीस ठाणे येथे याबाबत भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), २०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपी अमोल विठोबा तोडकरी याला घणसोली, नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. आरोपी याने अश्या स्वरूपाच्या अजूनही काही ठिकाणी फसवणूक केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर याबाबत नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या अधिक तपस करीत आहे