कशेडी घाटात भीषण दुर्घटना : प्रवासी बस पेटून खाक, सुदैवानं ४७ जण बचावले

कशेडी घाटात भीषण दुर्घटना : प्रवासी बस पेटून खाक, सुदैवानं ४७ जण बचावले
पोलादपूर(शैलेश पालकर) :
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी मार्गापर्यंतच्या नवीन रस्त्यावर बोरिवलीहून मालवणपर्यंत जाणाऱ्या खाजगी बसचा टायर गरम होऊन फुटला व पेट घेतल्याने लागलेल्या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावाच्या हद्दीत ही बस प्रवाशांच्या सामानासह जळल्याची घटना घडली.
पोलादपूर पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक सचिन रघुनाथ लोके (वय 30 रा. खार मुंबई) हा मनाली टूर्स अँड ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्र. एमएच ०२ एफजी २१२१) घेऊन बोरिवली ते मालवण असा जात असता कशेडी घाटातील भोगाव गावाच्या हद्दीत भुयारी मार्गातील रस्त्याजवळ १०० मीटर अंतरावर बस चालवित घेऊन आला असताना बसच्या टायरला अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान दाखवून चालकाने बस थांबविल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले. याचदरम्यान बसला आगीच्या ज्वाळांनी वेढले आणि संपूर्ण बस प्रवाशांच्या सामानासह भस्मसात झाली. मात्र, या खासगी बसमधील एकूण ४४ प्रवासी २ वाहक व १ क्लीनर ४७ जण बचावले.   
 
या घटनेची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यात समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पीएसआय पवार, पोलीस हवालदार बामणे, ठाणे अंमलदार रंजेश पवार, जाधव, खराडे, कदम, मोरे, साळुंखे, शिंदे  व होमगार्ड सुनील जगताप हे घटनास्थळी तातडीने रवाना झाले. याचवेळी कशेडी टॅप पोलीस मदत केंद्राचे पीएसआय  संतोष डोलारे, पोलीस हवालदार चाटे व मोहिते यांनीही घटनास्थळी जाऊन वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून दक्षता घेतली‌.
पोलादपूर पोलिसांनी तात्काळ खेड व महाड  नगर परिषद  येथील अग्निशमन यंत्रणांना पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.  मात्र, बस संपूर्ण पेटल्याने आगीत  जळून खाक झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. बस पेटल्यानंतर दोन्ही बाजूने वाहनांची दाटी काही काळ निर्माण झाली होती‌. वाहतूक पूर्वपदावर आल्यानंतर पोलिसांनी या बसमधील प्रवाशांना मालवण दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये बसवून आपआपल्या गावी रवाना करण्याची सोय केली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी हवालदार रंजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *