
मोतीराम पादीर (कर्जत ग्रामीण) :
कर्जत तालुका बहुल आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात ठाकूर समाज,कातकरी, महादेव कोळी समाजाच्या जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात रहात असून शैक्षणिक,आरोग्य दुष्टीने मागासलेला तालुका अशीही ओळख आहे. तालुक्यात चार शासकीय आश्रम शाळा असून आदिवासी विद्यार्थी संख्या खुप असल्याने शाळा अपुऱ्या पडत आहेत.आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची दखल घेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे तसेच तालुक्याचे लोक प्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे तसेच तालुक्यातील आदिवासी समाज संघटना यांच्या पुढाकाराने आज कळंब येथील काही वर्षापासून बंद पडलेली शासकीय आश्रम शाळा पुन्हा सुरु करण्यात आली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन यांच्या कार्यक्षेत्रातील कळंब आश्रमशाळा पटसंख्या अभावी बंद करण्यात आली होती.बंद केलेली आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांच्या पसंतीनुसार व भौतिक सोयी सुविधा असलेल्या जवळच्या आश्रम शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला होता.तसेच या आश्रम शाळेमध्ये शिकवत असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अन्य ठिकाणी पाठवण्यात आले.सध्या स्थितीत रायगड जिल्ह्यात आदिवासी जमातीची कातकरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून त्या ठिकाणी शासकीय आश्रम शाळा सुरू करण्याबाबत मागणी होत असल्याने या ठिकाणी सन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आश्रम शाळा सुरू करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी शासकीय आश्रम शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे, तालुक्यातील आदिवासी समाज संघटना यांच्याकडून वारंवार मागणी केली जात होती.तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून देखील या ठिकाणी शाळेची आवश्यकता असल्याने कळवण्यात आलेले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत कळंब तालुका कर्जत या ठिकाणाची बंद करण्यात आलेले प्राथमिक इयत्ता पहिली ते सातवी शासकीय आश्रमशाळा सन २०२५- २६ शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आले आहे. कळंब येथील शासकीय आश्रम शाळा तात्पुरती स्वरूपात कशेळे येतील भाडेतत्त्वावर पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
शासन निर्णय पहिल्या शैक्षणिक वर्षांमध्ये शासकीय आश्रम शाळेवर सन २०२५- २६ शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग सुरू करण्यास यावे त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून वर्गवाढ देण्यात यावी.शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रथमता आदीम जमातीच्या कातकरी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात यावा. तदनंतर जागा रिक्त राहिल्यास अनुसूचित जमातीला अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा आश्रम शाळा करिता तात्पुरती व्यवस्था म्हणून सन २०२५-२६ करिता आवश्यक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रतिनियुक्ती समायोजना या मार्गाने उपलब्ध करून घ्यावी व शाळा करिता आवश्यकते प्रमाणे पद निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा.
शासकीय प्राथमिक आश्रम शाळा सुरू करताना प्राधान्याने शासकीय जागा उपलब्ध करून घेऊन त्या ठिकाणी आश्रम शाळा इमारतीचे बांधकाम करण्याची नियोजन ठरवून करण्यात यावे दरम्यानच्या कालावधीत सदर आश्रम शाळेसाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून आश्रम शाळा सुरू करावी अशी आदेश देण्यात आले आहेत.
============================
कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेची वारंवार कळंब येथील बंद केलेली आश्रम शाळा चालू करण्याची मागणी होती. ती आश्रम शाळा चालू करण्यात आली असून आत्माराम धाबे प्रकल्प अधिकारी पेण व कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे.यांचे मनपूर्वक आभार. कळंब आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा
…परशुराम दरवडा, अध्यक्ष आदिवासी समाज संघटना कर्जत.
============================
कर्जत तालुका ग्रामीण भाग असल्याने येथील विद्यार्थी संख्या जास्त आहे. कळंब शाळेसाठी लोक प्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे, तसेच स्थानिक आदिवासी समाज संघटना यांनी वारंवार प्रकल्प पेण कार्यालयात पत्र व्यवहार करून त्यांची मागणी तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून देखील या ठिकाणी शाळेची आवश्यकता असल्याने मान्यता देण्यात आली आहे.
…आत्माराम धाबे , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण.
Related