कर्जत बालनिरीक्षण गृहातून रहस्यमयरीत्या मुलगा बेपत्ता; सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

रायगड | अमुलकुमार जैन
कर्जत येथील बालनिरीक्षण गृहातून एक मुलगा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे बालनिरीक्षण गृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगा स्वतः पळून गेला की त्याचे अपहरण करण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगा बाथरूमला गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. बाथरूमचा दरवाजा उघडून पाहिले असता मुलगा तेथे नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे बाथरूमच्या खिडकीची लोखंडी ग्रील तुटून खाली पडलेली आढळली. त्यामुळे मुलाने ग्रील तोडून पलायन केले की त्याला बाहेरून कोणाची मदत मिळाली, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या घटनेनंतर बालनिरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संवेदनशील संस्थेमधून एक मुलगा बेपत्ता होतो कसा? ग्रील तोडण्यासारखी घटना घडत असताना कोणालाही त्याची माहिती कशी मिळाली नाही? सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षक आणि देखरेख व्यवस्था नेमकी कितपत कार्यरत होती? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलाचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत. मुलगा स्वतःहून पळून गेला की त्याला कोणी पळवून नेले, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे बालनिरीक्षण गृहातील मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी होत आहे.