कर्जत तालुक्यात ५,७८८ घरगुती व २,५१० गौरींचे विसर्जन!

कर्जत | गणेश पवार
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात कर्जत तालुक्यातील सहा दिवसांच्या गौरी-गणपतींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. कर्जत तालुक्यात कर्जत, नेरळ आणि माथेरान पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ५ हजार ७८८ घरगुती आणि १२ सार्वजनिक गणपतींसह २ हजार ५१० गौरींचे विसर्जन झाले. विविध गणेश घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलिस ठाणेनिहाय आकडेवारीनुसार, कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ हजार ५०० घरगुती आणि सहा सार्वजनिक गणपतींसह १ हजार २३७ गौरींचे विसर्जन करण्यात आले. कर्जत शहरातील गणेश घाट, बामचा मळा, दहिवली व मुद्रे येथील गणेश घाटांसह कडाव, कशेळा आदी ग्रामीण भागातील विसर्जन घाटांवर गणेशभक्तांनी गर्दी केली होती. नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ हजार २२० घरगुती व पाच सार्वजनिक गणपतींसह १ हजार २५२ गौरींचे विसर्जन झाले. नेरळ गणेश घाट, ममदापूर, दहिवली, कोल्हारे, धामोते, वाकस, पोशीर, कळंब आदी ठिकाणी भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला. तर माथेरान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६८ घरगुती आणि एका सार्वजनिक गणपतीसह २१ गौरींचे विसर्जन हे वॉकर टॅंक’ उर्फ बादली गणेश घाटावर करण्यात आले. अशाप्रकारे संपूर्ण तालुक्यात सहा दिवसांच्या गौरी गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
नेरळ गणेश घाटावर आकर्षक व्यवस्था..
माथेरानच्या डोंगररांगांतून वाहणाऱ्या नैसर्गिक ओहळावर ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या धरणाच्या ठिकाणी सध्या नेरळ गणेश घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विसर्जनस्थळी यंदाही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गणेश घाट तसेच नेरळमधील मारुती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गणेश घाटावर ध्वनिव्यवस्थेद्वारे गणेशभक्तीपर गाणी सुरू ठेवण्यात आली होती. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नौकेची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर विसर्जनासाठी येणाऱ्या गौरी, गणरायांवर आणि भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नेरळमधील प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीमुळे विसर्जन सोहळ्याला विशेष भक्तिमय वातावरण लाभले.
विसर्जन सोहळ्याचे थेट चित्रीकरण करण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याने घाटावर सुरू असलेला विसर्जन सोहळा नागरिकांना पाहता आला. भाविकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याने विसर्जनाचा कार्यक्रम शांततेत पार पडला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती आणि पोलिस यंत्रणेकडून विविध ठिकाणी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दीच्या ठिकाणी तसेच विसर्जन घाटांवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीतांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायासह गौरी मातेलाही भावपूर्ण निरोप दिला.
दरम्यान, पाच दिवसांच्या गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर आता तालुक्यातील दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण पर्वणी सुरू झाली असून, विविध सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशोत्सवांमुळे कर्जत तालुक्यातील गणेशभक्तीचा उत्साह कायम आहे.