गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, मावा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असतानाच रायगडात भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी करून ९ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या कारवाईत तब्बल ८७ लाख ५८ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
सणासुदीच्या काळात मिठाई, मावा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. याच संधीचा गैरफायदा घेत काही विक्रेत्यांकडून भेसळयुक्त अथवा असुरक्षित पदार्थांची विक्री केली जाते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३१० अन्न नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०७ नमुने प्रमाणित आढळले, तर चार नमुने अप्रमाणित आणि चार नमुने असुरक्षित आढळले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कारवाई सुरू आहे. तसेच अन्नपदार्थांबाबत ६१८ ठिकाणी तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२९ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आठ जणांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.
गुटखा-पानमसाल्यावरही कारवाई
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधात जिल्ह्यात ३९ कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही दोन कारवाया करण्यात आल्या. भेसळयुक्त असल्याचा संशय असलेले तसेच विनापरवाना विक्री होत असलेले १,६९६ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. त्याची किंमत सुमारे ८४ हजार रुपये आहे.
विविध प्रकरणांमध्ये ११३ जणांवर दंडात्मक कारवाई करून ९ लाख ४७ हजार रुपयांचा दंड शासनजमा करण्यात आला आहे. याशिवाय प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या कारवाईत ८७ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवात तपासणीचा ‘फोकस’
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि माव्याच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिठाई व मावा उत्पादक आस्थापने, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. भेसळयुक्त अथवा असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
———————————————–
‘भेसळ आढळल्यास तक्रार करा’
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधून तक्रार करावी.
— मिलिंद महांगडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, रायगड