पेण–खोपोली मार्गावरील वरसई फाटा येथील चंपाली गार्डनसमोर ट्रेलरने ॲक्टिव्हा स्कुटीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटीस्वाराचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शांताराम भेसरे (वय ५९, रा. आष्टे, पो. वरसई, ता. पेण) हे खरवली येथे गणपती दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते MH-06-CG-0133 क्रमांकाच्या ॲक्टिव्हावरून वरसई (आष्टे) येथील आपल्या घरी शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास परतत होते. चंपाली गार्डनजवळ आले असता पेणकडून खोपोलीच्या दिशेने जाणारा MH-43-CQ-0867 क्रमांकाचा ट्रेलर समोरून येत होता. यावेळी ट्रेलरचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन बेदरकारपणे चालविल्याने ट्रेलरची ॲक्टिव्हाला जोरदार धडक बसली.
या अपघातात सुरेश भेसरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पेण पोलिस ठाण्यात ट्रेलरचालक प्रेमलाल कुअरमन यादव (वय ५०, रा. वडखळ, ता. पेण, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पेण पोलिस करीत आहेत.