श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास येथे गणेशोत्सवाची सांगता भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात झाली.मूळ वेळास आणि आगर वेळास या दोनही गावातील जवळ पास १२० गणपती व १५ गौरींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या दिवसांत घराघरांत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. गौरी-गणपतीची विधिवत पूजा,आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विसर्जनाच्या दिवशी सकाळ पासूनच गणेश भक्तांची लगबग सुरू होती.
दुपार नंतर गणपती व गौरींच्या विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात निघाल्या. महिला,पुरुष,युवक तसेच बाळ गोपाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणात गणरायाला आणि गौरीमातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी गावातील नागरिकांनी शांतता व शिस्त राखत विसर्जन सोहळा पार पाडला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण वेळास गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गौरी-गणपतीच्या विसर्जना नंतरही ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत भाविकांनी गणरायाला निरोप दिला.