नवी मुंबई विमानतळावर ९० टन माल घेऊन आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्गो विमानाचं यशस्वी लँडिंग

नवी मुंबई विमानतळावर ९० टन माल घेऊन आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्गो विमानाचं यशस्वी लँडिंग
पनवेल | प्रतिनिधी 
 नवी मुंबईच्या आकाशात १५ सप्टेंबर २०२६ रोजी ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. अझरबैजानमधील बाकू येथून उड्डाण केलेल्या सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सच्या अवाढव्य मालवाहू विमानाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) यशस्वी लँडिंग केले. तब्बल ९० टन आयात माल घेऊन आलेल्या बोईंग ७७७एफ (Boeing 777F) या दुहेरी इंजिन असलेल्या महाकाय विमानाच्या आगमनासोबतच नवी मुंबई विमानतळावरून अधिकृत आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान सेवेला प्रारंभ झाला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेले हे पहिले आंतरराष्ट्रीय कार्गो विमान ठरले आहे. या सेवेमुळे भारताचा थेट हवाई संपर्क अझरबैजानच्या बाकू शहराशी प्रस्थापित झाला असून, आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दृष्टीने नवी मुंबई विमानतळाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
या नव्या हवाई मार्गामुळे भारतासह सीआयएस (CIS) देश, युरोप आणि पश्चिम आशियातील विविध बाजारपेठांमध्ये मालाची वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. विशेषतः आयात-निर्यात क्षेत्र, उद्योग, व्यापारी तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात महत्त्वाचे कार्गो गेटवे ठरण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानाच्या स्वागतासाठी विमानतळ प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली होती. हजारो किलोमीटरचा प्रवास करून बाकूहून नवी मुंबईत दाखल झालेल्या या महाकाय विमानाच्या आगमनाने विमानतळावरील वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मालवाहू विमान सेवेला झालेली ही सुरुवात पश्चिम भारतातील व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपरेशन्सचा विस्तार झाल्यास आयात-निर्यात व्यवसायाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक उद्योग आणि व्यापारी क्षेत्रालाही नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.