महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. या तारखांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी), तर दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होऊन मंगळवार, १६ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, २० जानेवारी ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होऊन गुरुवार, ११ मार्च २०२७ रोजी संपणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी तारखा महत्त्वाच्या
परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे, विषयानुसार तयारी करणे आणि सराव परीक्षांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपलब्ध कालावधीचा योग्य वापर करून अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम व अधिकृत वेळापत्रक तपासूनच परीक्षेची तयारी करावी, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.