रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने होणाऱ्या या मेळाव्यांमध्ये विविध कंपन्या, उद्योग आणि आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पनवेल, खारघर, कामोठे, लोणेरे, पाली, कर्जत, रोहा, पेण, खोपोली आणि अलिबाग यांसह जिल्ह्यातील विविध केंद्रांवर रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. तांत्रिक, अभियांत्रिकी, औद्योगिक तसेच इतर विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील विविध उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पनवेल येथील Anjuman I Islam’s Kalsekar Technical Campus येथे १९ उद्योजकांकडून २९७ पदे उपलब्ध आहेत. पेण येथे पाच उद्योजकांकडून ३०६ पदे, तर खोपोली येथे ११ उद्योजकांकडून तब्बल ४०९ रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार महाकुंभाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून संबंधित केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, बायोडाटा आदी कागदपत्रे सोबत ठेवावीत. अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.