कर्जत तालुक्यात मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वी; 915 विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण

#Karjat eye axamination
कर्जत ग्रामीण | मोतीराम पादीर 
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, कर्जत हेल्थकेअर युनिट, रायगड मेडिकल असोसिएशन, कर्जत मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र होमिओपॅथी महिला डॉक्टर असोसिएशन आणि आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन 2, 3 आणि 4 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. आनंदो स्कूल एम्पॉवरमेंट प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्याची तपासणी करण्यास विशेष प्राधान्य दिले गेले. शिबिराला अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला.
शाळानुसार झालेल्या तपासणीत 2 डिसेंबर रोजी श्रमजीवी जनता विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, पोशिर येथे 496 विद्यार्थ्यांची तपासणी झाली व त्यापैकी 28 विद्यार्थ्यांना चष्म्याचा नंबर लागला. 3 डिसेंबर रोजी गौळवाडी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (इयत्ता 8 ते 12) येथे 276 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली व त्यापैकी 17 विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज असल्याचे निदान झाले. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी गौळवाडी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (इयत्ता 5 ते 7) मध्ये 143 विद्यार्थ्यांची तपासणी झाली ज्यात 3 विद्यार्थ्यांना चष्म्याचा नंबर लागला. तीनही दिवसांच्या उपक्रमात मिळून एकूण 915 विद्यार्थ्यांची तपासणी झाली आणि 48 विद्यार्थ्यांना रिफ्रॅक्टिव्ह एरर (चष्म्याचा नंबर) असल्याचे आढळले.
विशेष म्हणजे तपासणीत चष्मा लागलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच हॉस्पिटलतर्फे मोफत चष्मे पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळ्यांचे त्रास कमी होण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या शाळांमध्ये मोफत नेत्र तपासणी आयोजित केल्याबद्दल संबंधित संस्थांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *