कर्जत तालुक्यात महाशिवरात्री निमित्त ओंकाराचा गजर

Karjat Mahashiratra
कर्जत (गणेश पवार) :
कर्जत तालुक्यात महाशिवरात्री निमित्त तालुक्यातील शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला आहे. तालुक्यात नेरळ, पोशीर, मानिवली, बिरदोले कोल्हारे, तमनाथ, वैजनाथ, कर्जत अशा अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली, या प्रसंगी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर काही शिवमंदिराच्या ठिकाणी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
कर्जत तालुक्यात अनेक शिव मंदिरामध्ये भाविकांनी दिनांक २६ फेब्रुवारी सकाळपासून दर्शनासाठी वर्दळ सुरू केली होती. कोल्हारे येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या पांडवकालीन शिवमंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सकाळी प्रचंड गर्दी झाली होती, तेथील मंदिर हे उल्हास, चिल्लार व पेज या तीन नद्यांच्या संगमावर असुन, त्या ठिकाणी शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहावयास मिळत होती. तेथे सकाळपासून भजनाचे कार्यक्रम सुरु होते.
नेरळ साई मंदिर परिसरातील ओमकार नागेश्वर मंदिर, नेरळ येथील कुसुमेश्वर, खांडा येथील खांडेश्वर शिवमंदिर, वैजनाथ, तमनाथ, देवराई शिवमंदिर बोरगाव, कर्जत शहरातील कपालेश्वर, मुद्रेश्वर याशिवाय कर्जत तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. दरम्यान बिरदोले येथील बिरदेश्वर शिवमंदिरात दरवर्षी पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान मानिवली, शेलू, पोशीर, धामोते येथील धनेश्वरी मंदिर, नेरळ निर्माण नगरी येथील शिवमंदिर, मोहाचीवाड़ी,भड़वळ, बेकरे, पाषाणे, कळंब , पोही, खांडस, देवपाड़ा, वंजारपाडा, गुडवण,आदी ठिकाणी असलेल्या शिव मंदिरात सर्वत्र हजारो भक्तांनी गर्दी करून दर्शन घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *