काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने कर्जत तालुक्यात हजेरी लावली असून, मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने सर्वसामान्यांना अक्षरशः झोडपून काढले.
कर्जत तालुक्यात गेली दोन दिवस सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावून नागरिकांना सळो की पळो करून सोडले.नेरळ येथे बुधवार या आठवडी बाजारात अचानक पावसाचे सावट तयार होवून पाऊस कोसळल्याने दिवाळी खरेदी दारांची एकाच तारांबळ उडाली तर दुसऱ्या दिवशी आज 16 ऑक्टोबर गुरुवार रोजी तालुक्यातील कशेळे गावात काही मिनिटांच्या गडगडाटी पावसासोबत वाऱ्याचा तडाखा बसल्याने बाजारपेठेतील एका हॉटेलच्या शेडवरील प्लॅस्टिक कापड उडून गेले, तर गावात एक भलेमोठे झाड कोसळले. झाड कोसळताना आवाज देखील झाला त्याच प्रमाणे वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्याने तारा तुटल्या आणि संपूर्ण गाव अंधारात बुडाला आहे.
दुकानांच्या शटरमधून पाणी आत शिरल्याने काही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी धावाधाव करून घरांचा आसरा घेतला.
दरम्यान, या पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. हात तोंडाशी आलेल्या भात पिकांवर पावसाने मोठा आघात केला असून, काही शेतकऱ्यांची कापणी झालेली भातशेती पाण्यात भिजली आहे. उभ्या पिकांवर बुरशी लागण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुक्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून, प्रशासनाकडून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.