विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगतदार होत असताना कर्जतमध्ये त्याला गालबोट लागलं असल्याच चित्र आहे. आज कर्जत तालुक्यातील कडाव येथे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची प्रचार रॅली सुरू होती. तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या कार्यकर्त्याचा प्रचार सुरू होता. थोरवे यांच्या रॅली जवळ घारे यांचा एक वयस्क कार्यकर्ता जात असताना थोरवे यांनी त्यांना हाक मारली. बोलताना अचानक त्यांच्यात वाद होऊन महेंद्र थोरवे यांनी त्यांना थेट धमकी दिल्याने कर्जतमधील वातावरण तापले आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना आता खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून बुथला भेट देत कार्यकर्त्यांसह मतदारांना भेटीचे दौरे केले जात आहेत. तेव्हा आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर याच वेळी कडाव येथे महापरीवर्तन आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या कार्यकर्त्यांचा प्रचार देखील सुरू होता. अशात बाजारपेठेत थोरवे यांची रॅली सुरू असताना त्या ठिकाणी घारे यांचे वयस्क कार्यकर्ते मनोहर पाटील हे बाजूने जात होते. तेव्हा थोरवे यांनी त्यांना पाहिल्याने त्यांना हाक मारली. सुरवातीला दोघे नीट बोलत असताना अचानक दोघात काहीतरी बोलणे होऊन मनोहर पाटील यांनी मला धमकी देऊ नका अशा शब्दात थोरवे यांना सुनावले. त्यामुळे थोरवे हे देखील चिडले. मात्र कार्यकर्त्यांनी थोरवे यांना तेथून लगेचच बाजूला केले. मात्र भर बाजारपेठेत झालेल्या या राजकीय राड्याने कर्जत मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान याबाबत बोलताना थोरवे यांनी आपली बाजू मांडली. आपण या मतदारसंघात काम करताना कोण विरोधक कोण कुठला हे पाहिलं नाही. मात्र काल ज्यांची काम केली तेच आज विरोधात प्रचार करत आहेत. जे रेशनिंगच्या चोऱ्या करून आपल्याकडे प्रकरण मिटवण्यासाठी फेऱ्या मारत होते. तेच आज आपल्याशी अशा भाषेत बोलत आहेत. मी चुकीला कधी थारा दिला नाही. चुकीची काम केली नाहीत आणि कुणाच्या चुकांवर पांघरूण घातलं नाही म्हणत थोरवे यांनी कडाव बाजार प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र मतदारसंघात या प्रकरणाने वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे कर्जत मतदारसंघातील ही निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत चालली आहे.