
पनवेल : नवीन वर्षात संपूर्ण करंजाडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुमारे ४०० सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर करंजाडेतील सेक्टर ६ ते १ या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून नागरिकांनी नवीन वर्षात चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचे गिफ्ट मिळणार आहे. वर्षभरात करंजाडेवासियांची पाणी, वीज, आरोग्य सुविधा, गटारे, रस्ते यासह विविध समस्या मार्गी लावून पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अवघ्या एक वर्षात विविध प्रकारची ३१ विकासकामे मार्गी लावण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांनी केले.
करंजाडे ग्रामपंचायतीची स्थापना १ एप्रिल १९५६ साली झाली. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतीवर शेकापची एक हाती सत्ता होती. मात्र मागील वर्षी भाजपने शेकापची सत्ता उलथून लावली आणि ग्रामपंचायतीवर भाजपचे ११ पैकी १० सदस्य निवडून आले. करंजाडे ग्रामपंचायतीत सरपंच मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सत्तेला एक वर्ष पूर्ण झाले असून वर्षभरात करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची व प्रास्तावित विकासकामांची माहिती देण्यासाठी आज (मंगळवार दि. २ जानेवारी) करंजाडे ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सरपंच मंगेश शेलार हे पत्रकार व नागरिकांना माहिती देताना बोलत होते. वर्षभरात करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकासकामांमध्ये प्रामुख्याने करंजाडे गावातील प्रवेशद्वार, रुग्णवाहिका सेवा, गणेश नगर ते टाटा पॉवर रस्त्याचे कॉंक्रिटी करण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सभा मंडप बांधकाम, ग्रामपंचायत हद्दीत ओपन जिम, करंजाडेतील तलावातील गाळ काढणे, गणपती विसर्जन घाट बांधणे, करंजाडे गावात शौचालय बांधणे, शिवमंदिर येथे सार्वजनिक शौचालय बांधणे, सेक्टर ६ करिता १५० एमएलटी पाणी पाईपलाईन जोडण्याचे काम पूर्ण, करंजाडे वसाहतीतील सोसायटीत तसेच जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, गणेश नगर अंतर्गत गटारे दुरुस्त करणे, गावदेवी आदिवासी वाडी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, करंजाडेतील मुकरीची आदिवासी वाडी येथे शौचालय बांधणे, शिवमंदिर रस्त्याचे काँक्रिटीकरण, यासारखी विविध ३१ विकासकामे मार्गी लावण्यात करंजाडे ग्रामपंचायतीला यश आले आहे.
करंजाडेतील शिवमंदिर येथून पनवेल शहराला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा देखील सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. करंजाडे ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, ग्रामसेवक देवकर, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्ण शेलार, भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, गणेश मोरे, संतोष विखारे, राज इंगळे, सागर कदम, गणेश प्रबळकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केक कापून आनंद साजरा केला. तसेच नवीन वर्षात आणि यापुढील चार वर्षात करंजाडेमधील सर्व नागरिकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी करंजाडे ग्रामपंचायत कटिबद्ध राहणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
———————————–
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या वेळोवेळी लाभलेल्या मार्गदर्शनामुळे तसेच भक्कम पाठबळामुळेच वर्षभरात करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील विविध समस्या मार्गी लावण्यात यश आले. यासाठी सर्व सहकारी सदस्यांचेही चांगले सहकार्य लाभले. पुढील चार वर्षात अधिकाधिक विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन वर्षात करंजाडेतील नागरिकांना पाणी, उत्तम रस्ते, वीज आणि विविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासकामांचे चांगले गिफ्ट मिळेल याची ग्वाही देतो.
…मंगेश शेलार, सरपंच करंजाडे ग्रामपंचायत