आजकाल ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. Flipkart, Amazon, Meesho आणि Myntra यांसारख्या ई-कॉमर्स साइट्सवर ग्राहकांना 80% पर्यंत सवलती मिळतात. पण इतका स्वस्त माल कंपन्या कसा विकू शकतात, हा प्रश्न अनेकांना पडतो.
मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या थेट उत्पादकांकडून किंवा ब्रँड्सकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात. घाऊक खरेदीमुळे उत्पादनाची किंमत कमी होते आणि हा फायदा ग्राहकांना दिला जातो. शिवाय, नवीन मॉडेल्स येताच जुना स्टॉक लवकर संपवण्यासाठी मोठ्या सवलती दिल्या जातात.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दुकानांच्या तुलनेत खर्च खूपच कमी असतो. भाडे, विजेचे बिल किंवा कर्मचाऱ्यांचे पगार यांसारखे खर्च वाचतात. फक्त वेअरहाऊस व डिलिव्हरी खर्चामुळेच ते ग्राहकांना कमी दरात उत्पादने देऊनही नफा कमावू शकतात.
कंपन्या सणासुदीच्या काळात “फ्लॅश सेल”, “लिमिटेड टाइम ऑफर” किंवा “बिग बिलियन डेज”सारख्या मोहिमा राबवतात, ज्यामुळे ग्राहकांना तात्काळ खरेदी करण्याचा मोह होतो. मात्र, अनेकदा बनावट सवलतींचे जाळेही पसरवले जाते – मूळ किंमत आधी वाढवली जाते आणि नंतर मोठ्या सवलती दाखवल्या जातात. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीपूर्वी वस्तूची खरी किंमत तपासणे महत्त्वाचे आहे.