वेळास आगर (संतोष शिलकर) :
प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता प्रवाशांच्या रोषाचा सामना करत आहे. श्रीवर्धन आगाराची नालासोपारा-श्रीवर्धन आणि ठाणे आगाराची ठाणे-बागमांडला ही दोन महत्त्वाची बससेवा वेळेच्या मनमानीबाबत चर्चेत आहेत. दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये या विलंबामुळे तीव्र नाराजी आहे.
नालासोपारा-श्रीवर्धन गाडीचे वेळापत्रक कोलमडले
पूर्वी दुपारी १२:३० वाजता सुटणारी नालासोपारा-श्रीवर्धन ही गाडी आधी १:३०, नंतर २:३० आणि आता चक्क ३:३० ला सुटत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. उशीराने सुटल्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडथळे येतात, खाण्यापिण्याचे हाल होतात आणि गाडी मध्यरात्री श्रीवर्धनला पोहोचते, यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिक अधिकच त्रस्त आहेत.
आगारप्रमुख मणियार यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी वेळ १:३० अशी निश्चित केल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात अजूनही कोणताही बदल झालेला नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
ठाणे-बागमांडला गाडी तीन तास उशीराने
ठाणे आगारातून सकाळी ११:०० वाजता सुटणारी बागमांडला गाडी गेल्या पाच महिन्यांपासून २.५ ते ३ तास उशीराने सुटत आहे. या मार्गावर श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगर, भेंडखोल, बागमांडला, मारळ अशा अनेक भागांत प्रवास करणारे नागरिक दररोज याच गाडीवर अवलंबून असतात.
१४ जून रोजी प्रवासी श्रुती कोलथरकर आणि त्यांचे कुटुंब सकाळी १०:३० वाजता ठाणे डेपोत पोहोचले. गाडीबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. डेपो मॅनेजर पवार यांच्याशी संपर्क केल्यावर गाडी नंबर ४९२५ सांगितली, मात्र प्रत्यक्षात MH 14/BT/4009 नंबरची गाडी १:०० वाजता सुटली आणि ती बागमांडला येथे रात्री ८:४५ वाजता पोहोचली.
प्रवाशांची मागणी : एसटी प्रशासनाने वेळेचे काटेकोर पालन करावे!
या वेळापत्रकातील गोंधळामुळे आणि प्रवासातील हालांमुळे प्रवासी आता थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लक्ष घालण्याची मागणी करत आहेत.
त्यांनी एसटीच्या मनमानी टायमिंग, अस्वच्छ गाड्या, जुनी वाहने, आणि सेवा व्यवस्थेतील हलगर्जीपणा यावर तातडीने उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.
———————————————
मी गेली १८ वर्ष या गाडीने प्रवास करत आहे.दिनांक २०/५/२०२५ या तारखेला माझी तीन मुले पत्नी आम्ही या गाडीने प्रवास करत होतो. श्रीवर्धन कडे येणारे असे बरेच प्रवासी आहेत कि ज्यांचे वय ६५/७०/७५ च्या वर होते, लहान लहान ५/६/७ वर्षाचे मुलं होते,आम्ही आलो ती गाडी दुपारी ३:३० वाजता सुटली,त्यावेळे पासून पुढे नेहमीच घोडबंदर रोडला ट्राफिक जाम असतो. त्या कारणाने गाडीला पोहोचायला अधिक उशीर होतो. कोणाला बाथरूमचा प्रॉब्लेम,कोणाला वेळेत जेवण हवा असतो.पुढील प्रवासात काहीच मिळत नाही.नाश्ता नाही जेवण मिळत नाही. मी आणि माझी फॅमिली घेऊन निघालो ती बस नालासोपारा श्रीवर्धन ३:३० वाजता सुटली बरोबर रात्री १:३० वाजता वडवली फाट्यावर पोहोचली.यावेळी प्रवासी घरी कसा पोहोचू शकतो ? असा श्रीवर्धन डेपोचा प्रत्येक वेळेला मनमानी कारभार असतो.
