एकाच बांधकामाची ग्रामपंचायत दप्तरी दोनदा नोंद; सह्यांमध्ये सुद्धा घोळ तक्रारदारांचा आरोप

Dahivalee Gram Panchayat

कर्जत ( गणेश पवार ) : 

जागा जमीन आता महत्वाची झाली आहे. त्यामुळे भावकीत वाद होऊन नाती संपतात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यातच एक फूट जागेवरून देखील वाद होत असल्याचे देखील अनेकदा समोर आले आहे. असे असताना नेरळ शहराजवळील दहिवली तर्फे वरेडी हि ग्रामपंचायत हद्दीत जागेवरील एकाच बांधकामाची दोनवेळा वेगवेगळ्या क्षेत्राने नोंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर असेसमेंटवर करण्यात आलेल्या सह्यांमध्ये देखील घोळ असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केला आहे.
गजानन दबडे व कुटुंबाची मौजे मालेगाव येथे सर्वे नंबर ३ हिस्सा नंबर ४ अशी जागा आहे. या जागेत पूर्वी १९९६ साली कुक्कुटपालन करण्यासाठी शेड बांधण्यात आली होती. याची रीतसर तेव्हा परवानगी ग्रामपंचायतीने दिलेली होती. त्यामध्ये मालमत्ता क्रमांक ४९६ असा उल्लेख करण्यात आला होता. या जागेवर कौटुंबिक वाद असून त्यावर न्यायालयात देखील खटला सुरु आहे. तेव्हा संबंधित जागेचे असेसमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या गजानन दबडे यांना ४९६ यावर कर आकारणी केलेले दोन असेसमेंट असल्याचे लक्षात आले आहे.
एकावर ९२० चौरस फूट क्षेत्रफळ आहे मात्र दुसऱ्यावर ३८० चौरस फूट आहे त्यामुळे दोन असेसमेंट होऊन क्षेत्र कमी झाले कसे ? असा प्रश्न तक्रारदार दबडे यांनी विचारला आहे. तर असेसमेंट वर असलेल्या ग्रामसेवकांच्या सह्यांवर देखील त्यांनी बोट ठेवले आहे. तर याहून मोठी बाब म्हणजे १९९६ सालची परवानगीची नक्कल मागितली असता ती दप्तरी उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायतीने लेखी दिले आहे.
तर हे संबंध दप्तर गायब असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केला आहे. त्यामुळे याबाबत दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे खुलासा करणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *