उरण लोकलसेवेसाठी प्रवाशांचा आक्रोश : “प्रत्येक १५ मिनिटांनी लोकल सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा”

Uran
उरण (विठ्ठल ममताबादे) :
उरण-नेरूळ आणि उरण-बेलापूर लोकल सेवा १२ जानेवारी २०२४ रोजी सुरू झाली, ज्यामुळे उरणकरांचा प्रवास जलद व सुलभ झाला. औद्योगिक विकासामुळे नोकरी, शिक्षण व वैद्यकीय गरजांसाठी मुंबई-नवी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, सध्या दर तासाला चालणाऱ्या लोकलमुळे प्रचंड गर्दी व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
प्रवाशांनी, विशेषतः महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व नोकरदार वर्गाने दर १५ मिनिटांनी लोकल फेऱ्या सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. सकाळी ५ ते रात्री १२.३० पर्यंत लोकल सुरू करण्याची मागणीदेखील समोर आली आहे.
कामाच्या वेळा, रुग्णांची वैद्यकीय गरज, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता, तात्काळ लोकल वेळापत्रकात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. बामण डोंगरी, खारकोपर, उरण आदी स्टेशनांवरील अफाट गर्दी ही मागणी अधिक ठोस करत आहे.
डॉ. नितीन दिघे, अजय हेगळकर, आदिनाथ सारीक, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी संघटनांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांच्याकडे मागणी अर्ज सादर करण्याचे ठरवले आहे. मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
“जीवनदायिनी” मानल्या जाणाऱ्या मुंबई लोकलप्रमाणे उरण लोकलही प्रवाशांसाठी जीवन सुकर करणारी व्हावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *