
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण ते मोरा रोडवरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर रविवारी (दि. १) पहाटे तीनच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे उरण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.
उरण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या माहितीनुसार, महेश प्रल्हाद चांदेकर (वय ३५, रा. डोंगरआळी, उरण) हे सीबी शाईन (MH-46-BU-0421) या दुचाकीवरून मोरा येथून उरणकडे येत होते. त्याचवेळी निखील दिपक कुकडे (वय ३८, रा. नागाव रोड, उरण) हे बुलेट (MH-03-DP-1948) या दुचाकीवरून उरणहून मोरा दिशेने जात होते. हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र सकाळी ३.४० व ३.४५ वाजता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. वैभव यशवंत कडू यांच्या फिर्यादीवरून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १६६/२०२६ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि स्वप्नील केदार पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. उरण-मोरा मार्ग हा रुंद आणि सरळ असल्याने वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. अपघात झालेल्या ठिकाणी गतिरोधक किंवा वेग नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याने वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने गतिरोधक बसवून सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
Related