मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र असणाऱ्या रमजान महिन्यामध्ये तीस दिवस उपवास(रोजे) पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे इस्लामी शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळी ईदच्या नमाज नंतर सर्व मुस्लिम समाज बांधव एकत्रितपणे संपूर्ण विश्वाच्या अमन व शांतीसाठी प्रार्थना(दुआ)करतात, यावेळी गरीब असो कि श्रीमंत एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा देतात.
यावर्षी बुधवार दि.१० एप्रिल रोजी चंद्रदर्शन झाल्याने गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी भारतात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अलिबाग तालुक्यातील सोगांव येथे मुस्लिम समाज बांधवांनी मशिदीमध्ये रमजान ईद निमित्ताने नमाज पठणानंतर प्रार्थना(दुआ)करत एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधवांमध्ये एक प्रकारे आनंदाचे व उत्साहाचे
वातावरण होते.
रमजान ईद निमित्ताने सोगांव येथील पत्रकार अब्दुल सोगावकर यांना व त्यांच्या परिवाराला सोगाव पंचक्रोशीतील सर्व समाजातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील हिंदु बांधवांनी गळाभेट करून शुभेच्छा देत सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन दिले. यावेळी सोगावकर यांनी आलेल्या सर्व समाजातील बांधवांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत गोड शिरखुरमा खायला देत आपला आनंद द्विगुणित केला.
यावेळी रायगड जिल्ह्यातील काही पत्रकार बांधवांसह, युवा नेता सूचित थळे, बहिरोळे पो.पाटील प्रफुल्ल थळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, सुहास पाटील, सुयोग पाटील, प्रज्वल थळे, दिपक जाधव, रोशन पुजारी यांच्यासह रात्री उशिरा वेळात वेळ काढून किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, महाराष्ट्र पोलीस सागर गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी आवर्जून सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या, तर अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारे, फोनवरून तसेच काहींनी प्रत्यक्षात उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या.