आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायला बहिणींची तुफान गर्दी

आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायला बहिणींची तुफान गर्दी
महाड : 
रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांना त्यांच्या मतदारसंघातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील हजारो भगिनींनी राखी बांधून आशीर्वाद दिला. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात सुमारे १० ते १२ हजार बहिणींनी सहभागी होत आपले प्रेम आणि विश्वास व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही रक्षाबंधन परंपरा आता एक भव्य सामाजिक उपक्रम बनली आहे.
सुरुवातीच्या काळात आदिवासी भागातील महिला आपुलकीने भरतशेठ यांना राखी बांधत असत, परंतु मागील चार वर्षांपासून हा कार्यक्रम महिला आघाडीच्या माध्यमातून अधिक शिस्तबद्ध व व्यापक स्वरूपात राबवला जात आहे. जिल्हाभरातून बहिणी स्वतःच्या खर्चाने गोगावले कुटुंबीयांच्या निवासस्थानी येत असून आपल्या ‘नामदार भावाला’ राखी बांधतात. या भावनिक कार्यक्रमात भरतशेठ गोगावले यांचा संपूर्ण परिवार सहभागी होतो आणि प्रत्येक बहिणीचा सन्मानपूर्वक सत्कार करतो.
याप्रसंगी नामदार भरतशेठ गोगावले यांनी भावना व्यक्त करत सांगितले, “माझ्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच मी चार वेळा जनतेच्या सेवेसाठी निवडून आलो आहे. त्या स्वखर्चाने मला राखी बांधण्यासाठी येतात, ही माझ्यासाठी मोठी भावना आहे. आम्हा गोगावले कुटुंबाची श्रद्धा आहे की, या बहिणींवर संकट आलं तर आम्ही त्यांच्या मदतीला धावून जाणार.” त्यांनी स्पष्ट केले की रक्षाबंधन हा दिवस केवळ सण नसून त्यांच्या आणि त्यांच्या भगिनींसाठी नात्यांची साक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *