आज महाबळेश्वर–पाचगणीत कडकडीत बंद

आज महाबळेश्वर–पाचगणीत कडकडीत बंद
पोलादपूर | प्रतिनिधी 
सातारा जिल्हातील प्रमुख पर्यटनस्थळे असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-सुरूर या पर्यटन मार्गाच्या दुर्दशेविरोधात आज (८ मार्च) नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-सुरूर या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून धूळ, खड्डे आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे नागरिक तसेच पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे परिसरात प्रदूषणही वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत ८ मार्च रोजी महाबळेश्वर आणि पाचगणी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला आज मोठा प्रतिसाद मिळाला. दोन्ही शहरांमध्ये सकाळपासूनच अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली असून नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. सामान्यतः शनिवार-रविवारी पर्यटकांनी गजबजून जाणारे हे दोन्ही पर्यटनस्थळ आज मात्र शांत दिसत होते.
दरम्यान, पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-सुरूर या पर्यटन मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे आणि ते दर्जेदार पद्धतीने करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी केली असून सोमवार, ९ मार्चपासून परिस्थिती पूर्ववत होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.