‘आजीची शाळा’ अभियानाअंतर्गत पाटील कुटुंबीयांचं स्तुत्य पाऊल: आदिवासी महिलांसाठी शिक्षण आणि मुलांसाठी आर्चरी प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ

'आजीची शाळा' अभियानाअंतर्गत पाटील कुटुंबीयांचं स्तुत्य पाऊल: आदिवासी महिलांसाठी शिक्षण आणि मुलांसाठी आर्चरी प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ
पेण (सुदर्शन शेळके) :
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली असली, तरीही आजही काही समाजघटकांमध्ये शिक्षणाचा प्रसार अपेक्षेइतका झालेला नाही. विशेषतः आदिवासी समाजात अजूनही अनेक स्त्रिया अशिक्षित असून, त्यांना लिहिता-वाचता येत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन अलिबाग तालुक्यातील नामदेव नगर येथील सेवानिवृत्त ACP राजू (आनंद) पाटील यांची संकल्पना आणि पाटील कुटुंबीयांनी ‘आजीची शाळा’ या अभियानाअंतर्गत एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
6 एप्रिल रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर या अभियानाची सुरुवात करण्यात आली. आदिवासी महिलांना साक्षर करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात रोशनी पाटील आणि प्रणाली नाईक यांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळतो आहे. “आम्हालाही शिकायचं आहे,” या आत्मीय प्रेरणेतून अनेक आदिवासी महिला पुढे येत आहेत. विशेषतः दत्तवाडी, सांबरी आणि आवेटी येथील वाड्यांमधून महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येतो आहे.
हे केवळ शिक्षणाचं नव्हे, तर समाज उत्थान चं एक उदाहरण ठरत आहे. पाटील कुटुंबीयांचं हे पाऊल या महिलांच्या जीवनात खऱ्या अर्थाने नवीन प्रकाश पेरणारे ठरत आहे. त्यांच्या या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाटील कुटुंबीयांनी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. पंचक्रोशीतील मुलांना पारंपरिक आणि आधुनिक खेळांमध्ये प्रशिक्षण मिळावं, या उद्देशाने आर्चरी (बाणेबाजी) प्रशिक्षणाचीही मुहूर्तमेढ श्रीराम नवमीच्याच दिवशी रोवण्यात आली. आदिवासी व इतर समाजातील मुलांना या कलेत प्राविण्य मिळवता यावं, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांची कला समाजासमोर येण्यासाठी संधी मिळावी, हा यामागचा सकारात्मक विचार आहे. त्याच बरोबर याच दिवशी जतीन राठोड यांनी उपस्थीतांना आकाश दर्शनाची सफर घडऊन आणली.  
या उपक्रमात पाटील कुटुंबीयांमधील सुहास पाटील, राजू पाटील, उल्हास पाटील, अविनाश पाटील, विकास पाटील, आणि उज्वल पाटील यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या या एकत्रित प्रयत्नामुळेच हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात आकार घेताना दिसत आहे.
‘आजीची शाळा’ आणि आर्चरी प्रशिक्षण हे केवळ शिक्षण व कलेची बीजं रोवणारे उपक्रम नसून, ते सामाजिक परिवर्तनाचंही एक मजबूत पाऊल ठरू शकतात, याचा प्रत्यय या उपक्रमाच्या यशातून नक्कीच येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *