आखातातील युद्धाची झळ कोकणाला; हजारो तरुण मायदेशी, रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

अलिबाग | अमुलकुमार जैन 
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे परिणाम आता थेट कोकणावर उमटू लागले असून आखाती देशांत काम करणारे हजारो तरुण मायदेशी परतले आहेत. मात्र परतल्यानंतर त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
महाड, श्रीवर्धन, म्हसळा, खेड, चिपळूण, मंडणगड, दापोली आणि रत्नागिरी भागातील अनेक तरुण कुवेत, दुबई, इराणसह विविध आखाती देशांत जहाजवाहतूक, तेल कंपन्या, हॉटेल, ट्रान्सपोर्ट अशा क्षेत्रात कार्यरत होते. अनेक पिढ्यांपासून ही रोजगाराची परंपरा सुरू आहे. विशेषतः मुस्लीम समाजातील तरुण मोठ्या प्रमाणावर या देशांत कार्यरत आहेत.
मात्र गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती गंभीर बनली. विमान सेवा ठप्प झाल्याने चिंता वाढली, तर काही ठिकाणी उद्योजकांनी कामगारांना सुरक्षिततेच्या कारणास्तव घरी परतण्याचा सल्ला दिला. काहींना तिकीट देऊन “परिस्थिती सुधारल्यानंतर पाहू” असे सांगण्यात आले. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी अनेकांनी मायदेश गाठला.
घरी परतल्यावर कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला असला तरी पुढे काय, हा मोठा प्रश्न या तरुणांसमोर उभा आहे. त्यांच्या कमाईवर कुटुंबे अवलंबून असल्याने आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरही या रोजगारावर अनेक पूरक व्यवसाय अवलंबून होते.
विमान वाहतूक बंद असल्याने टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय ठप्प झाला आहे. विमानतळावर ने-आण करणाऱ्या शेकडो खासगी वाहनधारकांचे उत्पन्न बंद झाले आहे. तसेच कोकणातील बाजारपेठांमध्येही मंदीचे वातावरण आहे. अनेक वस्तूंचे दर वाढले असून खरेदी-विक्री कमी झाली आहे.
दरम्यान, युद्ध कधी थांबेल याची कोणतीही खात्री नसल्याने तरुणांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. “कंपनी टिकली तर परत बोलावू,” एवढेच आश्वासन काहींना देण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराचे भविष्य धूसर झाले आहे.
या पार्श्वभूमीवर परतलेले तरुण आणि त्यांची कुटुंबे आता युद्ध शांत होण्याची आणि पुन्हा रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.