अवांतर चर्चेपेक्षा अवांतर वाचनावर भर द्या : डॉ.ज्ञानोबा बानापुरे यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला!

Dr Dnyanabaa Banapure
महाड ( मिलिंद माने ) : आपल्याला भावी आयुष्य उज्वल करायचे असेल आणि सध्याच्या युगात स्पर्धात्मक परीक्षांना तोंड द्यायचे असेल तर महाविद्यालयीन विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी एखाद्या विषयावर अवांतर चर्चा करत बसण्यापेक्षा अवांतर वाचनावर भर दिला पाहिजे असे मत महाडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे यांनी व्यक्त केले. महाड पत्रकार संघाच्या वाचन चळवळ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात रायगड कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात ते बोलत होते.
समाजामध्ये सध्या वाढता मोबाईल आणि दूरचित्र वाहिनी सारख्या आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे कमी होत चाललेली वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाड पत्रकार संघाच्या वतीने वाचन जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या वाचन जनजागृती अभियानाचा दुसरा टप्पा महाड तालुक्यातील मोहोप्रे गावातील रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे, महाड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, कॉलेजचे व्यवस्थापक विजयराव चिमणकर, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे यांनी स्पर्धा परीक्षा ला सामोरे जात असताना वाचन किती महत्त्वाचे यावर या विद्यालयातील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व किती आहे हे पटवून दिले आपल्या दैनंदिन जीवनामधील वाचनाव्यतिरिक्त अवांतर वाचन करणे ही काळाची गरज आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी अवांतर विषयांवर चर्चा करत बसण्यापेक्षा अवांतर वाचन करण्यावर भर दिला पाहिजे असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या अवांतर वाचनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे असे सांगितले. वर्तमानपत्रातील इत्यंभूत माहिती आपल्या ज्ञानात भर घालत असते त्यामुळे वर्तमानपत्र वाचन मोबाईल वापरामुळे जरी मागे पडू लागले असले तरी आपल्या जीवनामध्ये वर्तमानपत्र वाचन करणे ही काळाची गरज बनली आहे असे सांगितले.
यावेळी सोशल मीडिया आणि कायदा सुव्यवस्था याबाबत राजेंद्र मायने यांनी विविध उदाहरणे देत सोशल मीडियाचा कशा पद्धतीने गैरवापर होत आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देत या सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करायचा याचे मोलाचे मार्गदर्शन केले. मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात आला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अख्ख विश्व आपल्या मुठीत आलेलं असलं तरी या मोबाईल वापरामुळे गुन्ह्यांचे स्वरूप देखील बदललेले आहे. त्यामुळे आपल्या गरजेपुरताच मोबाईलचा वापर करणे उचित राहील आणि समाज स्वास्थ्य आणि शांतता राखण्यास मदत होईल असे सांगून आपण या मोबाईलच्या आहारी न जाता त्याचा अभ्यास पूर्ण वापर केला पाहिजे असे देखील सांगितले.
यावेळी प्राचार्य माया देसाई, विजयराज चिमणकर, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाड पत्रकार संघाचे सचिव रोहित पाटील, . ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे , मिलिंद माने, गोपाळ कांबळे, . उदय सावंत ,राजेंद्र जैतपाल, प्रोफेसर मानकर सर, प्राचार्य मुंडे सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जैतपाल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *