अलिबाग-रेवस मार्गावर चोंढी पुलाजवळ झाड कोसळून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात यश !

Alibag Revas Road

अलिबाग/सोगाव (अब्दुल सोगावकर ) :

अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर चोंढी पुलाजवळ बुधवार दि.३१ जुलै रोजी दुपारच्या वेळी वडाचे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती, याची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत स्वखर्चाने पडलेले झाड यंत्राच्या व कोयत्याच्या साहाय्याने प्रसंगी हाताने तोडून बाजूला केले.
अलिबाग रेवस मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक झाडे रस्त्यावर वाकलेल्या स्थितीत आहेत, या मार्गावर कधी कोणत्या ठिकाणी झाड कोसळेल आणि वाहतूक ठप्प होईल याची कोणतीच शाश्वती राहिलीच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अशा धोकादायक असणाऱ्या झाडांची पाहणी करून ती काढण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी यापूर्वी केली होती.
तसेच यापूर्वी अनेकदा झाडे पडून वाहतूक ठप्प झाली होती, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी धोकादायक असलेल्या झाडांना न काढता त्यावर जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याने सदर विभाग एखादा भयंकर अपघात होण्याची वाट पाहत आहे, या रस्त्यावरून प्रवास करताना आम्हाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, असे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व वाहनचालकांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप व्यक्त करत सांगितले.
नेहमीप्रमाणे रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यासाठी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्यासोबत निलेश पवार, रोशन नाईक, गणपत नाईक, सूरज नाईक, निशांत कोळी यांनी मेहनत घेतली. मात्र यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हते. झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू केल्याबद्दल किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रवाशांनी व वाहनचालकांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *