रायगड जिल्ह्यातीलअलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आक्षी ग्राम पंचायत हद्दीतील साखर भागातील मासेमारी नौका या त्यांची मासळी उतरवून विक्री करण्यासाठी अलिबाग कोळीवाडा लगत असलेल्या समुद्र किनारी असलेल्या जेट्टीचा आधार घेत अतिक्रमण करीत असल्याने स्थानिक मच्छीमार नौका धारक आणि बाहेरून येणाऱ्या नौका धारक यांच्यात वाद निर्माण होऊन सदर वाद हे विकोपास जात असल्याने स्थानिक मच्छीमार नौका धारक यांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे अलिबाग येथील सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देत तक्रार केली आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग कोळीवाड्यात असलेल्या मच्छीमार संस्थेच्या जवळपास साडे तीनशे नौका मालक हे सभासद आहेत. सदर संस्थेच्या नौका ह्या समुद्रात मासेमारी करून ती उतरविण्यासाठी व मिळालेल्या मासळीचा लिलाव करण्यासाठी दररोज अलिबाग येथील हक्काच्या जेट्टी ठिकाणी येत असतात. सदर अलिबाग जेट्टी ही अलिबाग कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांच्या नौका लावण्यासाठी अपुरी पडत असताना त्याच जेट्टीवर साखर कोळीवाड्यातील नौका येऊन मच्छीमारी नौका येऊन मासळी उतरवून त्याची विक्री करीत असल्याने स्थानिक मच्छीमार यांच्यात वाद होऊन हे वाद विकोपाला जात आहे.त्यामुळे अलिबाग संस्थेच्या नौकांना मासे उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही.
साखर गावामध्ये मासळी उतरवण्यासाठी साखर आक्षी हे बंदर आहे. या बंदरावर मासे उतरवण्यासाठी नौका उभारण्यात याव्यात. साखर गावामध्ये बंदर असूनसुद्धा ते अलिबाग बंदरावर मासळी उतरवण्यासाठी व विक्रीसाठी नौका घेऊन येतात. त्यांना वारंवार सांगूनसुद्धा जाणूनबुजून अलिबाग बंदरावर बोटी लावल्या जातात. त्यामुळे हा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. अखेर मच्छिमार सोसायटीच्या वतीने मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांना लेखी पत्र देण्यात आले आहे. अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. अलिबाग येथील मच्छीमार नौका मालकांनी अलिबाग येथील मत्स्य व्यवसाय सहा.आयुक्त संजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.