पेण ( राजेश प्रधान ) : बाळ गंगाधरणासाठी संपादित झालेल्या जमिनीचे पैसे हडपण्याकरिता मुंबई येथील साबळे बनला गोडसे परंतु प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या भामट्याला गजाआड करण्यात यश आले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाकरिता शासनाने पेण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधीग्रहण केले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला पेण प्रांत कार्यालयातून देण्याचे काम सुरू आहे. बाळगंगा प्रकल्पातील काही प्रकल्पग्रस्त हे मुंबई, पुणे आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत. तसेच यातील अनेक खातेदार मयत झाले आहेत. या संधीचा फायदा घेत काही भामटे त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे पैसे हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त चिंतामण विश्वनाथ गोडसे हे मयत आहेत. त्यांची वरसई येथे गट नंबर 64 व 444 ही जमीन प्रकल्पा मध्ये समाविष्ट आहे. यातील गट नंबर 44 करिता 3 लाख 68 हजार 149 रुपये व गट नंबर 444 करिता 3 लाख 97 हजार 600 रुपये असे एकूण 7 लाख 65 हजार 749 रुपये लाटण्यासाठी आरोपी विश्वास अनंत साबळे ( (वय 55, रा. दहिसर, मुंबई) यानी मयत चिंतामण गोडसे यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून शपथ पत्रा मध्ये खाडाखोड करुन पैसे लाटण्याचा प्रयत्न केला होता. या बाबत पेण प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यना संशय आल्याने त्यांनी तातडीने या भामट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
या बाबत आरोपी विरोधात पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि. नं. 13/2024 भादवि कलम 420, 419, 465, 467, 468 व 471 प्रमाणे गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांचे मार्गदर्शन खाली पोलीस उप निरीक्षक समद बेग हे करीत आहेत.