कोकणात मागील चार दिवसापासून चाललेल्या मुसळधार पावसाचा फटका महाड एसटी आगाराला देखील बसला असून या आगारातून महाड व तालुक्याच्या ग्रामीण भागात व लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या एसटी वाहतूक सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
कोकणातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या महाड तालुक्यात सावित्री, गांधारी, व काळ या मोठ्या नद्यांसह उपनद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यातच महाबळेश्वरमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण देखील वाढल्याने महाड शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. त्यामुळे महाड आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसेस सेवा पूर्णतः बंद झाली आहे.
महाड आगार हे कोकणातील एसटीचे मध्यवर्ती आगार असून या आगारातून महाड व पोलादपूर तालुक्यासह मुंबई, ठाणे, पुणे, बोरिवली, जळगाव, अक्कलकोट, यासह नाशिक इत्यादी ठिकाणी लांब पल्ल्याच्या एसटी बसेस चालविल्या जातात मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठण्याजवळील सुकेळी खिंडीत तसेच माणगाव मार्ग ताम्हणे घाटात तसेच महाड पोलादपूर आंबेनळी घाटात व खेड जवळील खवटी जवळ दरड आल्याने या मार्गावरील लांब पल्ल्याच्या एसटी बसेस वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्याचा फटका आज शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला नसला तरी कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना मात्र बसला आहे.+
पोलादपूर बस स्थानकातून तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणारी एसटी बस सेवा सध्यातरी चालू आहे, मात्र पोलादपूर तालुक्यातील गावे ही दुर्गम व डोंगराळ भागात असून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होत आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या मार्गावर दरड आल्यास त्या ठिकाणावरील देखील एसटीचे वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाड आगारातून ग्रामीण, लांब पल्ल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या ३४९ बसेसच्या फेऱ्या मार्गक्रमण करीत असतात मात्र त्यातील३०० बसेसच्या फेऱ्या अतिवृष्टीमुळे पूर आल्याने तसेच महामार्ग व ग्रामीण मार्ग बंद असल्याने बंद ठेवण्यात आल्याची माहिती महाड आगारप्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिली.