राज्यभरातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून खरीप हंगाम वाया गेल्यानंतर आता रब्बी हंगामही हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा संकटात भाजप-शिंदे-फडणवीस सरकारने केवळ नावालाच मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे तीव्र शब्दांत टीकास्त्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोडले.
सपकाळ यांनी मागणी केली की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये, तसेच सर्वसमावेशक कर्जमाफी देण्यात यावी.
पनवेल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून संविधान संवाद यात्रेच्या निमित्ताने ‘कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर २०२५’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला रामचंद्र आबा दळवी, भानुदास माळी, गोपाल तिवारी, आर. सी. घरत, श्रुती म्हात्रे, सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे, हरेश केणी, जनार्दन पाटील, शाहीर संभाजी भगत आदी उपस्थित होते.
सपकाळ पुढे म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. अदानी-अंबानींच्या फाईलवर झटपट सह्या करणारे हे सरकार, शेतकऱ्यांना मदत देताना मात्र हात थरथरतो काय? हे सरकार मुठभर धनदांडग्यांचे आहे, शेतकरी व गोरगरिबांचे नाही.”तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधत विचारले की, “महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असताना पंतप्रधान नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील काय? नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करताना दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास सरकार घाबरत आहे, अदानींच्या दबावाखाली निर्णय घेतला जात आहे.”
राहुल गांधींबद्दल मनोज जरांगे यांनी वापरलेले शब्द अयोग्य असल्याचे सांगत, सपकाळ म्हणाले की, “राहुल गांधी यांनीच आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणाची लढाई राजकारणासाठी नव्हे, तर समाजहितासाठी आहे.”
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच पनवेलमधील विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.