वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील सालिदे बुर्डी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व मोबाईलसह लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २४ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० ते रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या भिंती व कौल यांच्यामधील उघड्या खोपीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, सव्वा तोळ्याचा सोन्याचा हार, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच पॅन्को कंपनीचा सीसी-१ मॉडेलचा मोबाईल फोन असा मौल्यवान ऐवज लंपास केला.
या चोरीतील मुद्देमालाची किंमत अंदाजे ३ लाख ९७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर प्रकरणी २५ मे २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास वडखळपोलिस ठाण्याचे पो.स.ई. चव्हाण हे करीत आहेत. तसेच परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.