शेतकऱ्यांच्या जमिनीवर डल्ला मारणाऱ्यांना मनसेचा इशारा”; बाळा म्हात्रे यांचा कर्जत दौऱ्यात एल्गार

कर्जत | गणेश पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांनी कर्जत तालुक्याचा धावता दौरा करत पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका स्पष्ट केली. नेरळ,कोल्ह्यारे आणि माणिवली येथे भेट देत त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना बाळा म्हात्रे यांनी, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी रायगड जिल्ह्यात मनसेची ताकद अधिक वाढविण्याचे काम केले जाईल,” असे सांगितले.
म्हात्रे यांनी स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडताना, “कर्जत तालुक्यातील टोरांटो वीज प्रकल्प, शिलार धरण किंवा पोशीर धरण यांसारख्या कोणत्याही प्रकल्पांमध्ये जर शेतकऱ्यांचा आणि स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या बाजूने उभी राहील. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा इशारा दिला.
तसेच, “परप्रांतीयांची दादागिरी रायगडमध्ये खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक अन्यायाविरोधात मनसे रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. पक्षातील जुने-नवे कार्यकर्ते एकत्र आणून संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“हा माझा धावता दौरा असला तरी आगामी काळात कर्जत तालुक्यात मनसे पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने आणि आक्रमकपणे काम करताना दिसेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे, उपजिल्हाध्यक्ष अभिजित घरत, महिला जिल्हाध्यक्ष छाया शिंदे तसेच कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांचा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कर्जत व नेरळ शहरातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.