महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठे क्रूझ टर्मिनल उभारण्यात आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील इंदिरा डॉक येथे बांधण्यात आलेले मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल (MICT) हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल ठरले आहे.
या भव्य टर्मिनलचे व्हर्च्युअल उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथून केले. एमआयसीटीचे पहिले दोन मजले २,०७,००० चौरस फूट क्षेत्रात पसरले असून, संपूर्ण टर्मिनल ४.१५ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर वसले आहे. दरवर्षी अंदाजे १० लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता येथे आहे.
एकाचवेळी ५ मोठी क्रूझ जहाजे उभी राहू शकतील अशी रचना या टर्मिनलला देण्यात आली आहे. प्रवाशांसाठी ७२ चेक-इन व इमिग्रेशन काउंटर, २२ लिफ्ट, १० एस्केलेटर तसेच पार्किंगमध्ये ३०० हून अधिक वाहनांची सोय आहे. यासाठी ५५६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
लहरी छताची आकर्षक रचना, मुंबईच्या वारशातून प्रेरित प्रवेशद्वार, सेल्फी पॉइंट्स, विशेष आसनव्यवस्था यामुळे हे टर्मिनल प्रवाशांसाठी जागतिक दर्जाचा अनुभव देणार आहे.