शिस्ते (श्रीवर्धन) येथे अदानी फाउंडेशन व दिघी पोर्टतर्फे प्रथमच भव्य मोफत आरोग्य शिबिर, २६३ ग्रामस्थांना लाभ

शिस्ते (श्रीवर्धन) येथे अदानी फाउंडेशन व दिघी पोर्टतर्फे प्रथमच भव्य मोफत आरोग्य शिबिर
वेळास आगर (संतोष शिलकर) : 
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे शिस्ते येथे अदानी फाउंडेशन व दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या वतीने गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी आगरी कम्युनिटी हॉलमध्ये प्रथमच भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईतील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची तपासणी करून मोफत उपचार व योग्य मार्गदर्शन देण्यात आले.
या शिबिरात डॉ. वैभव पाटील (जनरल फिजिशियन), डॉ. दिशा गोपाळकृष्ण (स्त्रीरोग तज्ञ) व डॉ. सुयश विरकर (त्वचारोग तज्ञ) यांच्यासह हेल्पएज इंडिया यांच्या माध्यमातून रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह तपासणी तसेच फिरता दवाखाना सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वृद्धांच्या सांधेदुखी व गुडघेदुखीसारख्या आजारांवरही मोफत उपचार करण्यात आले. या शिबिरात एकूण २६३ ग्रामस्थांनी लाभ घेतला.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायत शिस्ते व स्थानिक मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजनात ग्रामसखी, महिला मंडळ व आगरी समाज पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान राहिले. अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील यांनी पुढील काळातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करून गावकऱ्यांना अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *