Facebook-Instagramवरील अश्लील जाहिरातींपासून सावधान! 7 बनावट अॅप्सच्या माध्यमातून सायबर फसवणुकीचा धोका

PEN न्यूज ऑनलाइन टीम |
डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर वाढत असताना सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अश्लील किंवा आकर्षक जाहिराती दाखवून नागरिकांना बनावट वेबसाइट आणि धोकादायक अॅप्सच्या जाळ्यात ओढले जात असल्याचा गंभीर इशारा केंद्र सरकारच्या सायबर यंत्रणेने दिला आहे. अशा जाहिरातींवर क्लिक केल्यास आर्थिक नुकसानासोबतच मोबाईलमधील संवेदनशील माहितीही चोरीला जाण्याचा धोका आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट एनालिटिक्स युनिटने याबाबत इशारा दिला आहे. सायबर भामटे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील अश्लील जाहिरातींचा वापर करून नागरिकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले आहे.
या जाहिरातींवर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यांना बनावट किंवा फिशिंग वेबसाइटवर नेले जाते. त्यानंतर गुगल प्ले स्टोअरऐवजी थर्ड पार्टी वेबसाइटवरून APK फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जाते. अशा पद्धतीने मोबाईलमध्ये धोकादायक अॅप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला जातो.
सरकारने अशा फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या Night Play, Reloop, Kyss, Riva, Vima, Nexo आणि Vixa या सात अॅप्सबाबतही इशारा दिला आहे. ही अॅप्स अश्लील कंटेंटच्या आमिषातून वापरकर्त्यांना आकर्षित करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
थर्ड पार्टी वेबसाइटवरून APK डाउनलोड करून अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते अॅप मोबाईलमधील Accessibility सारख्या संवेदनशील परवानग्या मागू शकते. वापरकर्त्याने या परवानग्या दिल्यास सायबर गुन्हेगारांना मोबाईलवरील संदेश, OTP, बँकिंग अॅप्स आणि इतर संवेदनशील माहितीपर्यंत पोहोच मिळण्याचा धोका निर्माण होतो.
याच्या माध्यमातून नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले जाऊ शकतात. एवढेच नव्हे तर काही प्रकरणांमध्ये मोबाईलमध्ये गुपचूप VPN इन्स्टॉल करून इंटरनेट ट्रॅफिकचा गैरवापर करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वापरकर्त्याच्या नकळत त्याच्या डिव्हाइसचा गैरकृत्यांसाठी वापर होण्याचा धोका आहे.
या प्रकारचे धोकादायक अॅप मोबाईलमध्ये एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर ते सहजपणे हटवता येऊ नये, यासाठीही तांत्रिक अडथळे निर्माण केले जाऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीलाच अशा जाहिराती आणि संशयास्पद अॅप्सपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
  • Google Play Store किंवा Apple App Store व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून अॅप किंवा APK डाउनलोड करू नका.
  • सोशल मीडियावरील अश्लील, आकर्षक किंवा संशयास्पद जाहिरातींवर क्लिक करणे टाळा.
  • कोणत्याही अॅपला गरज नसताना Accessibility किंवा इतर संवेदनशील परवानग्या देऊ नका.
  • संशयास्पद अॅप डाउनलोड झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने इंटरनेट बंद करा आणि तज्ज्ञांची मदत घ्या.
  • आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा.
सोशल मीडिया स्क्रोल करताना दिसणारी एक छोटीशी जाहिरातही मोठ्या आर्थिक संकटाचे कारण ठरू शकते. त्यामुळे आकर्षक ऑफर किंवा अश्लील कंटेंटच्या आमिषाला बळी न पडता प्रत्येक लिंक आणि अॅपकडे संशयाने पाहणेच सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.