सामाजिक संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील लघुलेखकाविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मानिक म्हात्रे (वय ५०), लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी, धर्मादाय आयुक्त कार्यालय, अलिबाग, असे आरोपीचे नाव आहे.
३४ वर्षीय तक्रारदाराने सामाजिक संस्थेची नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून देण्याबाबत आरोपी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी म्हात्रे यांनी यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीची २१ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने १० हजार रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवत ती रक्कम सायंकाळी धर्मादाय आयुक्त कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मात्र, आरोपीला कारवाईचा संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लाच स्वीकारण्याची कारवाई होऊ शकली नाही.
या प्रकरणी ८ सप्टेंबर रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांनी तक्रारीची पडताळणी केली. पोलीस उपअधीक्षक सरिता आय. एस. भोसले यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. रायगड कार्यालयाचा दूरध्वनी ०२१४१-२२२३३१, व्हॉट्सॲप ८०८७८२१०६४ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ आहे.